पुणे ग्रॅण्ड सायकल टूरच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा सायकल ट्रॅक भीषण स्थितीत पुणे : कधी काळी सायकलींचे शहर अशी पुण्याची असलेली ओळख हरवून बराच काळ लोटला. सायकलींचे शहर ही ओळख पुन्हा प्राप्त करण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या सायकल ट्रॅकपैकी केवळ ११ टक्के ट्रॅकच सुस्थितीत असून ८९ टक्के ट्रॅकची दुर्दशा झाल्याचे चित्र समोर आले आहे. आयटीच्या आगमनाबरोबर बदलत्या काळात पुण्यात खासगी वाहनांची झालेली बेसुमार वाढ आणि अपुऱ्या रस्त्यांमुळे सायकल चालविणे अशक्यप्राय झाले आहे. सायकल संस्कृतीला चालना देण्यासाठी शहरात जानेवारी महिन्यात पुणे ग्रॅण्ड टूर ही सायकल स्पर्धा होत आहे. त्यासाठी महापालिका तब्बल १५० कोटी रुपये खर्च करून ७५ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करत आहे. मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केली जाणार आहे. मात्र, प्रत्यक्षात सायकल ट्रॅकच दुरावस्थेत असताना नागरिक सायकल कशी चालवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर परिसर संस्थेने शहरातील १९ प्रमुख रस्त्यांवर पालिकेने उभारलेल्या ८५ किलोमीटरपैकी सुमारे ३५ किलोमीटर सायकल ट्रॅकचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सायकल ट्रॅकची पडझड, तुटलेले पृष्ठभाग, अतिक्रमण आणि देखभालीचा अभाव या गंभीर समस्या आढळल्या. सर्वेक्षणामध्ये प्रत्येकी ५०० मीटर अंतराचे ७७ तुकडे निश्चित करून त्यांचा स्वतंत्र अभ्यास केला.२०१७ मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत पालिकेने शहराचा एकात्मिक सायकल आराखडा तयार केला होता. त्यातील निकषांनुसार कोट्यवधींची खर्च करून हे ट्रॅक उभारले होते. काय सांगतो अहवाल ? अहवालानुसार, १९ पैकी ४ रस्त्यांवरील ११ टक्के ट्रॅक पूर्णपणे सुस्थितीत आहे. ११ रस्त्यांवरील ६१ टक्के ट्रॅक ठिकठाक अवस्थेत आहे. मात्र, त्यावर सायकल चालविणे सुरक्षित नाही. कारण फुटलेले, खड्डे पडलेले पृष्ठभाग, तुटलेले इंटरलॉक, अतिक्रमण, आणि दुरुस्तीचा पूर्ण अभाव अशा समस्या तेथे आहेत. ५ रस्त्यांवरील २८ टक्के ट्रॅक पूर्णपणे खराब आहेत. मोठमोठे खड्डे, अर्धवट, तुटलेले बांधकाम, अतिक्रमण, पार्किंग, खोदकाम, अपुरा निचरा अशा कारणांमुळे हे ट्रॅक वापरण्यायोग्य नाहीत. सर्वेक्षणात ट्रॅक अखंड वापरण्यायोग्य आहे का, अडथळे आहेत का, वाहतुकीपासून विभाजन, चौकांची रचना, प्रकाशयोजना, अतिक्रमण, पृष्ठभागाचा दर्जा, देखभाल, निचरा, सुरक्षित चालण्याचा अनुभव अशा महत्त्वाच्या निकषांचा आधारे मूल्यांकन केले. अहवालातील शिफारशी * शहरव्यापी सलग सायकल नेटवर्क उभे करणे * सध्याचे ट्रॅक तुकड्यांत असून सलगता नसल्याने वापर अत्यल्प * डिझाइन सुधारणा, स्पष्ट मार्किंग करणे * ट्रॅक ओळखण्यासाठी ठळक साइनबोर्ड, मार्किंग करणे * एनएमटी समिती, स्वतंत्र सायकल विभाग सुरू करणे * ट्रॅकवरील पार्किंग, अतिक्रमण हटवणे * नियमित देखभाल, दुरुस्तीची सक्ती * मेट्रोशी एकत्रीकरण करून ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’साठी सायकल वापर वाढवणे