पुणे : मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. तरीही आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे टोमॅटो, वांगी, मटारच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर हिरवी मिरची, घेवडा आणि भुईमूग शेंगाच्या भावात घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. येथील बाजारात रविवारी (दि. ८) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक येथून टोमॅटो ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १५ ते २० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, मध्य प्रदेश येथून गाजर ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश येथून घेवडा २ ते ३ टेम्पो, हिमाचल प्रदेश ३ ते ४ टेम्पो मटार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी २ ते ३ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ८ ते १० टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची ४० ते ४५ टेम्पो यांचा समावेश आहे. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ५ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ४ ते ५ टेम्पो, भुईमूग शेंग १०० ते १२५ गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ५० ते ६० टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.