Pune : आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचा संप स्थगित

पुणे : महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेने १८ फेब्रुवारीपासून कायदेशीर नोटीस देऊन आरोग्यमित्रांच्या मागण्यांसाठी संप सुरू केला होता. आरोग्य मित्रांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी विधानसभा अधिवेशन काळात बैठक लावून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले, तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्र आरोग्यमित्र संघटनेने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ७ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावून चर्चा केली होती. तेव्हा टीपीए यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव दिला होता. तो संघटनेला मान्य नव्हता. त्यामुळे आणखी वेतनवाढ करावी, अशी मागणी केली होती.
त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वात आरोग्यमित्रांच्या शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्यासोबत चर्चा करत आरोग्यमित्रांच्या समस्या मांडल्या. आरोग्यमंत्री डॉ. आबिटकर यांनी विधानसभेच्या अधिवेशन काळात संबंधितांची बैठक बोलावून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले, तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करून या प्रश्नात लक्ष घालून आरोग्यमित्रांना न्याय देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.




