Pune : विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची खर्च मर्यादा वाढविण्यास मान्यता

पुणे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक, तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या आहार खर्चाची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
राज्यातील ८६ हजार ४०० शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या १ कोटी विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येतो. केंद्र शासनाने प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. यानुसार शासन निर्णयाने प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी ५.४५ रुपये आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी ८.१७ रुपये याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती.
आता केंद्राच्या निर्णयानुसार प्राथमिकच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ६.१९ रुपये तर उच्च माध्यमिकच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ९.२९ रुपये याप्रमाणे प्रतिदिन प्रति विद्यार्थी याप्रमाणे आहारासाठी खर्च मर्यादा ठरविण्यात आलेली आहे. त्यास शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता मिळालेली आहे.
ग्रामीण भागामध्ये तांदळासोबतच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो. धान्यादी मालापासून आहार बनविण्यासाठी आहार खर्चाची विभागणीही करण्यात आलेली आहे. १ मार्च २०२५ पासून दरवाढ लागू करण्यात आल्याचे शालेय पोषण आहार विभागाचे अवर सचिव प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.





