पुणे : दहावी परीक्षेदरम्यान ३७ परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडले होते. आता या परीक्षा केंद्रांची मान्यता चौकशीअंती कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. परीक्षेत गैरप्रकार घडल्याचे आढळून आल्यास संबंधित केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, अशी सूचना यापूर्वीच राज्य शिक्षण मंडळाने दिली होती. त्यामुळे गैरप्रकार घडलेल्या परीक्षा केंद्राची आता मान्यता रद्द होणार आहे. दहावी परीक्षांमध्ये गैरप्रकाराची प्रकरणे आढळून आलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित सर्व व्यक्तींची नियुक्ती ही केंद्रांवर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधून करण्यात आली होती. त्यानुसार राज्यात दहावीच्या परीक्षेत पाच हजार १३० परीक्षा केंद्रांपैकी ७०१ केंद्रांवर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित सर्व व्यक्ती बदलण्यात आल्या होत्या. शिवाय, राज्यात २७१ भरारी पथके, दक्षता समिती, विशेष महिला भरारी पथक, विशेष भरारी पथके, आकस्मिक भेटी याद्वारे परीक्षेवर देखरेख ठेवण्यात आली. त्यानंतरही परीक्षेदरम्यान राज्यात ३७ परीक्षा केंद्रांवर ९३ गैरप्रकार आढळून आले. सहा तक्रारी दहावी परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर घडलेल्या घटना आणि इतर प्रकरणांबाबत एकूण सहा प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात नागपूर आणि नाशिक विभागात प्रत्येकी दोन, तर छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण सहा तक्रारी दाखल केल्या आहेत.