पुणे : महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेच्या निकालानुसार पात्र ठरलेल्या १६४ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी नियुक्ती करण्यात आली असून, त्यातील काही जण यापूर्वीच शासकीय सेवेत कार्यरत होते. त्यांना नियुक्ती स्वीकारण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली. त्यानंतरही ४५ उमेदवारांनी वेळेत नियुक्ती स्वीकारली नाही. त्यामुळे या ४५ उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाच्या एकूण 164 पदांसाठी दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल 11 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे आयोगाने शिफारस केलेल्या 164 उमेदवारांची या विभागाच्या मंत्रालयीन विभागात व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी 10 डिसेंबर 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. यातील नियुक्त झालेल्या 18 उमेदवारांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या सेवेत अगोदरच कार्यरत असल्यामुळे सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर रुजू होण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती केली होती. अशा 18 उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी 9 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढही देण्यात आली. नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या ३० दिवसांच्या मुदतीत उमेदवार रुजू न झाल्यास सबंधित उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार नियुक्ती केलेल्या 164 उमेदवारांपैकी व मुदतवाढ दिलेल्या 18 उमेदवारांपैकी एकूण 45 उमेदवारांनी कालावधीत नियुक्ती स्वीकारली नाही. त्यामुळे मुदतीत रुजू न झालेल्या ४५ उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.