महिलांसाठी ८३ जागा राखीव; १६५ जागांसाठी सोडत पुणे – गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. नव्याने समाविष्ट ३४ गावांमुळे प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाल्याने अनेक इच्छुकांच्या नजरा या सोडतीकडे लागल्या होत्या. मात्र, काही मोजक्या माजी नगरसेवकांचे प्रभाग वगळता बहुतांश माजी नगरसेवकांना अनुकूल असे आरक्षण पडल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, सोशल मीडियावरून पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या आधीच आपले पॅनेल निश्चित करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात ८३ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, तसेच निवडणूक विभागप्रमुख प्रसाद काटकर उपस्थित होते. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठीची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू आहे. यापूर्वी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत एकत्रितपणे जाहीर केली जात होती. मात्र, गोंधळ टाळण्यासाठी आयोगाने ऑक्टोबर महिन्यातच प्रभागरचना अंतिम केली होती. त्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. महापालिकेच्या या निवडणुका चार सदस्यीय प्रभागांत होणार असून, १६५ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी ८३ जागा महिलांसाठी, २२ जागा अनुसूचित जातींसाठी, २ जागा अनुसूचित जमातींसाठी आणि ४४ जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सर्वाधिक तीन आरक्षणे प्रभाग क्रमांक १ मध्ये पडली असून, त्यात एससी (महिला), एसटी (सर्वसाधारण) आणि ओबीसी (महिला) आरक्षणांचा समावेश आहे, तर पाच नगरसेवकांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये तीन महिला आरक्षणे आणि दोन पुरुषांसाठी जागा आहेत. त्यामुळे या प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली असून, चार ते पाच माजी नगरसेवकांमध्ये थेट आमनेसामने लढत होण्याची शक्यता आहे. असे काढण्यात आले आरक्षण महापालिकेकडून आरक्षण प्रक्रियेत सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अनुसूचित जमातींचे प्रभाग निश्चित करून त्यांची आरक्षणे जाहीर करण्यात आली. त्यात प्रभाग क्रमांक १ आणि ९ यांचा समावेश होता. चिठ्ठीद्वारे महिला आरक्षण निश्चित करताना प्रभाग क्रमांक ९ मध्ये एसटी (महिला) आरक्षण ठरले. यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणावर अनुसूचित जातींचे २२ प्रभाग निश्चित करण्यात आले आणि त्यापैकी ५० टक्के म्हणजे ११ प्रभागांमध्ये महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे ओबीसींच्या ४४ आरक्षित जागांपैकी २२ जागा महिलांसाठी चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आल्या. असे आहे आरक्षण….. – अनुसूचित जमाती : २२ जागा – ११ जागा महिलांसाठी राखी – अनुसूचित जमाती : २ जागा – १ जागा महिलांसाठी राखीव – इतर मागासवर्गीय प्रवर्ग : ४४ जागा – २१ महिलांसाठी राखीव पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदलणार चित्र; आरक्षण जाहीर पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले असून मोठ्या प्रमाणात झालेल्या बदलांमुळे महापालिकेचे चित्र देखील बदलण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवारी (दि. ११) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे प्राधिकृत अधिकारी म्हणून होते. ३२ प्रभागांपैकी २० प्रभागांमध्ये अनुसुचित जातीसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी राखीव असणाऱ्या जागांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यामध्ये २० जागांपैकी १० जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ३१, ४, १९, ३२, १७, २३, १०, २१, ३, २९ या मध्ये अनुसुचित जाती (एससी ) जागांसाठी महिलांचे आरक्षण आहे. तर अनुसचित जमाती (एसटी) साठी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ३ प्रभाग निश्चित करण्यात आले. नियमानुसार २ प्रभागामध्ये महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २९ आणि ३० या दोन प्रभागांमध्ये महिलांसाठी जागा राखीव आहे. तिसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) सोडत प्रक्रिया पार पडली. शहरातील ३२ प्रभागांत थेट जागा निश्चित करण्यात आल्या. तर उर्वरित दोन जागांसाठी सोडत काढत प्रभाग ५ आणि ६ मध्ये ओबीसीसाठी जागा राखीव करण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी प्रभाग ५, ६, ८, ९, ११, १३, १६, २०, २५, २६, २७, २, १८, २२, १०, ४, १९ या १७ जागा आरक्षित झाल्या.