Pune : अण्णा भाऊ साठे महामंडळाची लघु उद्योगासाठी थेट कर्ज योजना

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून त्यासाठी २१ मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.
या योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या प्रकल्प मूल्यासाठी महामंडळाचे बीजभांडवल ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असून, बीजभांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर असणार आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या महिला समृध्दी योजना रक्कम १ लाख ४० साठी एनएसएफडीसीचा सहभाग १ लाख २५ हजार रुपये, १० हजार रुपये अनुदान, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असून, या रक्कमेवर ४ टक्के व्याजदर असणार आहे.
अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्डची छायांकित प्रत, व्यवसायासाठी आवश्यक जागेचा पुरावा, तीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान, कर्जाचा लाभ न घेतल्याबाबतचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र, आधार क्रमांकाशी जोडणी केलेल्या बँक खात्याचा तपशील, ग्रामसेवकाचे शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक व पात्र अर्जदारांनी अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, नमुन्यातील अर्ज आदींबाबत विश्रांतवाडी येथील कार्यालयात संपर्क साधून माहिती घ्यावी, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी स्पष्ट केले आहे.




