– रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर : तनपुरेवस्ती (बुरसेवाडी) ता. खेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन महिन्याचा मादी जातीचा बछडा ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि २८ ) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
शिरूर -भिमाशंकर या राज्य महामार्गावर बुरसेवाडीलगत तनपुरेवस्ती येथे अज्ञात वाहनाने ३ महिन्याच्या बछड्याला धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने बछडा जागीच ठार झाला. ही घटना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळतात घटनास्थळी धाव घेतली. हा मादी जातीचा बछडा आहे. त्यांचे वजन ६ किलो आहे.
घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वनपाल प्रदीप कासारे, एन. डी. विधाटे, आर. एस. गोकुळे, एस.आर. राठोड, सीमा सपकाळ यांनी भेट दिली. तसेच खरपुडी (ता. खेड) येथे रोपवाटिकामध्ये मृत बछड्याचे अग्निदहन करण्यात आले. डोंगरदऱ्यातून पाणी पिण्यासाठी हा बछडा चासकमान धरण परिक्षेत्रात येत असताना रस्ता ओलांडताना अपघात झाला असावा, असा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.
यापूर्वी पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता. तर दोन महिन्यांपूर्वी सातकरस्थळ जवळ एका बछड्याचा मृतदेह सापडला होता.