पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने अर्थव्यवस्था, आस्थापना आणि शिक्षण व्यवस्था बदलत असताना, विश्वकर्मा विद्यापीठाच्यावतीने सोमवार (दि १५ डिसेंबर) रोजी ‘एआय युगातील मनुष्यबळ’ या विषयावर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) तसेच प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सहकार्याने एआय पूर्व शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. हॉटेल हयात इस्ता, पुणे येथे झालेल्या या दिवसभराच्या परिषदेत धोरणकर्ते, उद्योजक जगतातील वरिष्ठ अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञान व्यावसायिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. समावेशक आणि जबाबदार एआय स्वीकारासाठी भारताचे मनुष्यबळ कसे सक्षम करता येईल, यावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. ही परिषद भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार मंत्रालय तसेच इंडिया एआय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली. याशिवाय, विद्यापीठाने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस यांच्यासोबतही सहकार्य केले. उद्घाटनपर भाषणात विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अगरवाल यांनी तंत्रज्ञान प्रगतीमध्ये मानवी घटकाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “मानवी भांडवल गुंतवणूक आकर्षित करते आणि पायाभूत सुविधा व प्रशासनाच्या मर्यादा असतानाही शहरांचा विकास घडवून आणते. एआय युगात उद्योग व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी हे सर्वजण एकाच वेळी शिकत आहेत. आणि कधी कधी विद्यार्थी शिक्षकांपेक्षा अधिक जाणतात. अभियांत्रिकी नसलेल्या क्षेत्रांसह सर्वच व्यावसायिक क्षेत्रांवर एआयचा प्रभाव पडत आहे आणि ते आत्मसात करण्याची गती वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. पुणे शहर मानवी प्रतिभेच्या विकासामुळे सातत्याने प्रगती करत आहे,” असे त्यांनी सांगितले. मुख्य भाषणात तंत्रज्ञान परिषदेचे प्रशिक्षण व अध्ययन विभागाचे संचालक आणि ब्युरो प्रमुख डॉ. सुनील लुथ्रा यांनी एआय विषयक चर्चेचे राष्ट्रीय आणि जागतिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “फेब्रुवारी २०२६ मध्ये भारत ‘एआय इम्पॅक्ट समिट’चे आयोजन करणार असून, एआयचा उपयोग समावेशक मानवी विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि शाश्वत प्रगतीसाठी कसा करता येईल, यावर भविष्योन्मुख जागतिक अजेंडा मांडण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या लाभांशाचे एआय लाभांशात रूपांतर करण्यासाठी भविष्यासाठी सज्ज अभ्यासक्रम, सातत्यपूर्ण प्राध्यापक कौशल्यवृद्धी, आश्वासक उद्योग–शैक्षणिक सहकार्य, नैतिक एआय पद्धती आणि आजीवन शिक्षण ही राष्ट्रीय संस्कृती बनणे आवश्यक आहे,” परिषदेला संबोधित करताना इन्फोसिस पुणे फेज-२ आणि मुंबईचे प्रमुख तसेच उपाध्यक्ष व डिलिव्हरी प्रमुख प्रवीण कुलकर्णी यांनी कार्यपद्धती आणि आस्थापनाच्या पुनर्रचनेची गरज अधोरेखित केली. “एआय स्वीकारणे म्हणजे केवळ तंत्रज्ञान स्वीकारणे नाही. मानवी निर्णयक्षमतेसोबत बुद्धिमान प्रणाली एकत्र आणण्यासाठी कामाची पद्धत, मनुष्यबळ आणि कार्यस्थळ यांचे पुनर्रचना करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने माणसाची जागा घेऊ नये, तर विश्वास, सहकार्य आणि सामायिक मूल्यांच्या आधारे मानवी क्षमतेत वाढ करावी,” असे ते म्हणाले. ऐतिहासिक परिवर्तनांशी तुलना करत एफआयएस चे वरिष्ठ उपाध्यक्ष (अभियांत्रिकी) रोहित रामानंद म्हणाले, “आपण औद्योगिक क्रांतीसारख्या टप्प्यावर आहोत. काही नोकऱ्या नष्ट होतील आणि काही नव्या निर्माण होतील, मात्र त्या एकसारख्या नसतील किंवा त्यासाठी लागणारी कौशल्येही वेगळी असतील. जे उद्योग मानवी भांडवलात गुंतवणूक करतील, कौशल्यांचे पुनर्रचना करतील आणि उच्च मूल्याच्या कामावर लक्ष केंद्रित करतील, तेच यशस्वी ठरतील,” शिक्षण आणि नेतृत्वाच्या भविष्यासंदर्भात बोलताना डसॉल्ट सिस्टिम्स – ग्लोबल सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष तांबे म्हणाले, “एआयसोबत काम करण्यासाठी बुद्धिमान प्रणालींशी संवाद साधण्याचे कौशल्य तसेच सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि नेतृत्व यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण मानवी कौशल्ये अधिक बळकट करणे आवश्यक आहे. एआय नोकऱ्या हिरावून घेण्यासाठी नाही, तर त्या अधिक चांगल्या बनवण्यासाठी आहे. सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत आरेसबी ट्रान्समिशन्स (आय ) लिमिटेडचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा म्हणाले, “शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी उद्योगांसोबत अभ्यासक्रम आणि उपाययोजना विकसित करत नाहीत, तोपर्यंत विकसित भारत शक्य नाही. योग्य मानवी भांडवलाशिवाय एआयची अंमलबजावणी होऊ शकत नाही आणि आरोग्यसेवा, शाश्वतता व लॉजिस्टिक्ससारख्या राष्ट्रीय आव्हानांवर उपाय शोधण्यातच एआयचे खरे मूल्य आहे,” असे त्यांनी सांगितले. एआय प्री-समिटमध्ये उदयोन्मुख कौशल्य गरजा, अभ्यासक्रम रूपांतरण, प्राध्यापक क्षमतावृद्धी आणि आजीवन शिक्षण चौकट यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. मुख्य भाषणे आणि तज्ज्ञ चर्चांमधून मानवी बुद्धिमत्ता, नैतिक निर्णयक्षमता आणि सामाजिक जबाबदारी या घटकांनी मशीन बुद्धिमत्तेला कसे पूरक ठरावे, याचा आढावा घेण्यात आला. तंत्रज्ञान परिषद , भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इंडिया एआय, सीआयआय आणि इन्फोसिस यांच्या सहकार्याने आयोजित या परिषदेतून धोरणात्मक दृष्टिकोन आणि व्यवहार्य उपाययोजना सुचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत पुण्याचे शिक्षण, नवोपक्रम आणि विचार नेतृत्वाचे केंद्र म्हणून असलेले स्थान अधोरेखित झाले. दिवसभर चाललेल्या या प्री-समिटमध्ये ‘विकसित भारतासाठी एआय धोरणे’, विविध क्षेत्रांतील एआय जागरूकता व प्रभाव, तसेच शाश्वत एआय या विषयांवरील सत्रांवर चर्चा करण्यात आली. विष्वकर्मा विद्यापीठाचा हा उपक्रम आंतरशाखीय शिक्षण, नवोपक्रम आणि सामाजिक सुसंगततेबाबतची त्यांची बांधिलकी दर्शवतो. देशभरातून सहभागी होण्याची अपेक्षा असलेल्या या परिषदेमुळे पुण्याचे शिक्षण, नवोपक्रम आणि विचार नेतृत्वाचे केंद्र म्हणून असलेले स्थान अधिक दृढ झाले आहे.