सर्व जागा लढवणार, १८ डिसेंबरपर्यंत मुदत पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेसने सर्व जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. ही माहिती पक्षाचे शहर प्रमुख माजी आमदार सुनील टिंगरे, प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी दिली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी निवडणूक स्वबळावरच लढविण्याचे अनेकवेळा सूतोवाच केले असून ४१ प्रभागांमधील सर्वच्या सर्व १६५ जागांसाठी हे अर्ज मागविले आहेत. निवडणुकांची चाहूल लागताच सर्वात आधी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, त्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अर्ज मागवत आपली निवडणूक प्रक्रीया सुरू केली आहे. त्यामुळे, इच्छुकांच्या प्रचाराला वेग आला आहे. पक्षाच्या प्रसिध्दीपत्रकानुसार राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांनी विहित नमुन्यातील इच्छूक उमेदवारी अर्ज भरून शिवाजीनगर पक्ष कार्यालयात द्यावा. सोमवारपासून ( दि.८ डिसेंबर) ते १८ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.