पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचे काम ‘फास्ट ट्रॅक’वर – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे- पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढावीत आणि मोठ्या विमानांना उतरण्याची सोय व्हावी, यासाठी धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामाला आता वेग येणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे काम ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भूसंपादन, पर्यायी रस्ता आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतला. लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्नही सुटला असून, पुणे महापालिका हवाई दलाशी समन्वय ठेवून हा रस्ता तयार करणार आहे.
नुकतीच धावपट्टी विस्तारीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विमानतळ संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे अधिकारी, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह बैठकीत चर्चा केली. या कामाला गती देण्यासाठी सर्व यंत्रणांना सुस्पष्ट सूचना देण्यात आल्या.
मोहोळ म्हणाले, “धावपट्टी विस्तारीकरणासाठी सैन्य आणि खासगी जागेची गरज यावर चर्चा झाली. हवाई दलाची जागा विमानतळ प्राधिकरणाला मिळावी, यासाठी प्रस्ताव सैन्य मुख्यालयाकडे पाठवला जाईल. या बदल्यात प्राधिकरण हवाई दलाला पर्यायी जागा आणि आस्थापनेचा खर्च देईल. विश्रांतवाडी ते लोहगाव रस्ता बाधित होणार असल्याने हवाई दलाच्या जागेतून पर्यायी रस्ता होईल, ज्याचा खर्च महापालिका करेल. हे काम वेगाने पूर्ण होईल.”
धावपट्टी विस्तारीकरणाला गती…
मोहोळ म्हणाले, “पुणे विमानतळाची गरज लक्षात घेता धावपट्टी विस्तारीकरण तातडीने आणि वेगाने होणे गरजेचे आहे. पुरंदर विमानतळाची प्रक्रिया सुरू असली तरी पुण्याची तात्काळ गरज पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवणे महत्त्वाचे आहे. भूसंपादन राज्य सरकारकडून वेगाने होईल, पण त्यासाठीची तयारीही वेळेत पूर्ण करावी लागेल.”


