एका दिवसात ३५ हजार प्रवाशांनी केला प्रवास पुणे – हिवाळी हंगाम सुरू होताच पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या शुक्रवारी (दि. १४) सर्वाधिक ३५ हजार ७१० प्रवाशांनी प्रवास केला असून, आतापर्यंतचा एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. यंदाच्या हिवाळी हंगामामध्ये विशेष विमान सेवा वाढलेल्या नाहीत. येत्या काही दिवसांमध्ये दोहा ही नवीन विमान सेवा सुरू होणार आहे. या ठिकाणाहून दिवसाला साधारण १०० विमाने उड्डाण करतात. तर, १०० विमाने पुण्यात येतात. सध्या सण, सुट्ट्या नसतानाही पुणे विमानतळावर गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या शुक्रवारी पुणे विमानतळावर सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असल्याचे दिसून आले. त्यामध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मिळून १०० विमानांचे ऑपरेशन झाले. यापैकी १७ हजार ८१० प्रवासी पुण्यात दाखल झाले, तर १७,९०० प्रवाशांनी पुण्यातून देशभर व विदेशात प्रवास केला. त्यामुळे विमानतळाच्या आज पर्यंतचा सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा दिवस ठरला. पुणे विमानतळावर दररोज साधारणपणे ३० ते ३२ हजार प्रवासी ये-जा करतात. मात्र, शुक्रवारी हा आकडा जवळपास साडेतीन हजारांनी वाढला. त्यानंतर प्रवासी संख्या कायम ३५ हजारांच्या जवळ राहत असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.