Pune Airport – जागतिक आरोग्य संघटनेने इबोला व्हायरस संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी केला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनेनुसार विमानतळ आरोग्य संस्था आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी विमानतळावर कडक तपासणी व पूर्वतयारी उपाययोजना लागू केल्या आहेत. सध्या बँकॉंक आणि दुबई या दोन शहरांमध्ये इबोला व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य केले आहे. सर्व प्रवाशांना विमानातून उतरण्यापूर्वीच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म (स्वयं-घोषणापत्र) भरणे बंधनकारक केले आहे. त्यामध्ये प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचा इतिहास, आरोग्याची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. तपासणी दरम्यान ज्या प्रवाशांमध्ये इबोलाची लक्षणे आढळतील किंवा संशयित रुग्ण आढळल्यास, त्यांना तातडीने उपचारासाठी महानगरपालिकेच्या नायडू रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल केले जाणार आहे. या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी एअरपोर्ट हेल्थ ऑफिसर आणि विमानतळ प्राधिकरणाकडून इमिग्रेशन, कस्टम्स आणि एअरलाईन ऑपरेटरच्या सर्व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये पीपीई किटचा वापर करणे, तपासणी करणे आणि संशयित रुग्णांना सुरक्षितपणे हाताळणे आदी बाबींचा समावेश आहे. विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग आणि तपासणी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ताप, अशक्तपणा, उलट्या किंवा रक्तस्त्राव यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास आणि बाधित क्षेत्रातील प्रवासाचा इतिहास असल्यास प्रवाशांनी तात्काळ विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या एकही संशयित किंवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरीही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.