प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडले असून त्याच्याकडून दोन कोटी २९ लाखांचा गांजा जप्त केला. बँकाँकहून आलेल्या प्रवाशाने सामानात गांजा लपविला होता.८ डिसेंबर रोजी बँकाँकहून आल्यावर हा प्रवासी घाईघाईत बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. कस्टमच्या अधिकाऱ्यांना त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर बॅगेत दोन हजार २९९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा सापडला. हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाला मागणी असते. जप्त गांजाची किंमत दोन कोटी २९ लाख रुपये आहे. प्रवाशाने बँकांँकहून गांजा आणल्याची माहिती कस्टमला चौकशीत दिली. हा गांजा कोणासाठी, कोणाकडून आणला, याचा तपास सुरू आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.