पुणे – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला एजटांचा विळखा

रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांचा गैरप्रकार : नागरिकांच्या तक्रारींचे प्रशासनाकडून गंभीर दखल

पुणे – राज्यातील सर्वाधिक महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला एजटांनी विळखा घातला आहे. विशेष म्हणजे अशी एजंटगिरी करण्यात मनोरुग्णालयाचे कर्मचारीच आघाडीवर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या एजंटामुळे मनोरुग्णालयाची प्रतिमा मलीन होत असून त्याचा त्रास मनोरुग्णालयाच्या कुटुबांना होत आहे. या एजटांच्या मनमानी कारभारामुळे मनोरुग्णांच्या कुटुबिंयाना अव्वाच्या सव्वा रक्कम मोजावी लागत आहे.

यासंदर्भात अनेक नागरिकांनी थेट राज्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याची गंभीर दखल प्रादेशिक मनोरुग्णालयाने घेतली आहे. त्यानुसार एक तर एजंटगिरी करा, अन्यथा नोकरीला मुकाल असा सज्जड दम मनोरुग्णालय प्रशासनाने भरला आहे.

येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अखत्यारित सोळा जिल्ह्यांचा कारभार आहे. या मनोरुग्णालयात उपचार घेण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र आणि थेट विदर्भ तसेच मराठवाडा येथील मनोरुग्ण येत असतात. या मनोरुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया खूपच किचकट आहे. हा रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक येथे आल्यानंतर संबंधित डॉक्‍टरांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात येत असते. मात्र, संपत्ती लुबाडण्यासाठी अथवा अन्य कारणांसाठी संबधित नागरिकाला मनोरुग्ण ठरवून त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्याची प्रकरणे यापूर्वी अनेकवेळा घडली आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तो वेडा आहे अथवा नाही हे ठरविण्याचा अधिकार मनोरुग्णालयाला नाही, तर तो मनोरुग्ण आहे अथवा नाही यावर न्यायालयाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करण्यात येते.

परिणामी, संबधित रुग्णाला घेऊन त्याच्या कुटुबिंयांना शिवाजीनगर न्यायालयात जावे लागते. न्यायालयातही याबाबतची प्रक्रिया अतिशय किचकट असून अनेकांना संबधित न्यायालय आणि वकिल शोधताना तारेवरची कसरत करावी लागते. याचाच गैरफायदा घेऊन अनेक कर्मचाऱ्यांनी त्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. या रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी पाच ते दहा हजार रुपयांचे रेट ठरविले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांचे टोळकेच तयार झाले आहे. अशाप्रकारे या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत अनेकांना हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी थेट राज्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची गंभीर दखल राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने घेतली असून अशा एजटांना आळा घालण्याच्या सूचना प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या प्रशासनाला केल्या आहेत.

यासंदर्भात येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजित फडणीस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, यापूर्वी अशा कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली होती. तरीही त्यांच्यात फरक न पडल्यास त्यांच्यावर यापुढील कालावधीत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पगार मनोरुग्णालयाचा काम मात्र दुसऱ्याचेच!
बहुतांशी मनोरुग्णांचे नातेवाईक हे बाहेर गावाहून येत असतात. त्यांना पुण्यातील अथवा न्यायालयातील कोणतीही माहिती नसते. त्यासाठी या कुटुबिंयांना भुरळ घालण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी चार ते पाच जणांचे ग्रुप तयार केले आहेत. हा ग्रुप त्यांना कागदपत्रे तयार करून देण्यासह अन्य सर्व कामे करत असतात. विशेष म्हणजे कामावर असतानाही हे कर्मचारी संबधितांना न्यायालयात घेऊन जाण्यासाठी मदत करतात. त्यामुळे पगार मनोरुग्णालयाचा आणि काम दुसऱ्याचे अशी त्यांची अवस्था झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.