पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यात बांबू लागवड लोकप्रिय असली तरी मोठी संधी असूनही उर्वरित पुणे जिल्ह्यात बांबू लागवड झालेली नाही. या पुढील काळात क्षेत्रीय स्तरावर कर्मचाऱ्यांना व्यक्तीशा टार्गेट देऊन काम करावे, असे मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांचे सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवड अभियानविषयक आढावा बैठक पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो डॉ. चारुशीला देशमुख-मोहीते, तसेच डॉ. कृपाण घोष, के.सी.साई कृष्णन, डॉ.ओ.पी. श्रिजीत, डॉ. एस. डी. सानप, आरती बंडकर, नवनाथ अवताडे आदी उपस्थित होते. यावेळी पाशा पटेल म्हणाले, पुणे जिल्ह्यामध्ये क्षमता असूनही बांबू लागवडीमध्ये दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. वातावरण बदलाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरण बदलाच्या संकटामुळे मानव जातीसमोरचे सगळे मार्ग खुंटले आहेत. 2050 पर्यंत समुद्र किनारी असणारे देश आणि शहरे बुडण्याची शक्यता आहे. कोळसा आधारित औष्णिक प्रकल्प बंद करावे लागणार आहेत. सर्वांनाच आता पर्यावरणपूरक वस्तू वापराव्या लागणार आहेत. वेगाने वाढणारा बांबू एकमेव गवतवर्गीय वृक्ष असून, बांबू बहुउपयोगी आहे.