पुणे : संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर किरकोळ अपघातानंतर मोटारचालक महिलेने एकाला फरफटत नेले. समाज माध्यमातून या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोेलिसांनी मोटारचालक महिलेला अटक केली. या प्रकरणी मोटारचालक महिला मेरसेदे रसुलीफर (४५) हिला अटक करण्यात आली. या घटनेत राम लक्ष्मण राठोड (३४) हे जखमी झाले. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक महिला शनिवारी (१७ जानेवारी) येरवड्यातील सादलबाब दर्गा रस्त्याने संगमवाडीकडे निघाली होती. त्या वेळी तेथून निघालेल्या मोटारचालक राम राठोड याच्याबरोबर किरकोळ अपघातानंतर वाद झाला. राठोड याने मोटार थांबवून मोटारचालक महिला मेरसेदे हिला मोटारीतून बाहेर येण्यास सांगितले. तिने मोटार सुरू ठेवली. मोटारीच्या समोर राठोड थांबले. मोटार सुरू ठेवल्याने राठोड यांनी मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. मोटारचालक महिलेने मोटार पुढे नेली. प्रसंगावधान राखून राठोड यांनी बोनेट धरून ठेवले. मेरसेदे हिने मोटार दोन किलोमीटर पुढे नेली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.