Pune : सोशल मीडियावर ४ महिन्यांपासून जाहिरात

पुणे : शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त केला. या बनावट चलन रॅकेटच्या तपासातून असे उघड झाले आहे, की यातील आरोपी सोशल मीडियाचा वापर करून बनावट नोटांच्या विक्री आणि वितरणात गुंतले होते. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. त्यांनी त्यावर छायाचित्र आणि व्हिडिओ शेअर करत नोटा विक्रीतून भरपूर नफा कमवा, अशी जाहिरात केली असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी दिली.
हे रॅकेट एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने कासारवाडी येथील खासगी बँकेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये नोटा जमा केल्यानंतर उघडकीस आले. बँकेला त्या नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तीन पुरुष आणि दोन महिलांना अटक करून एकूण २८ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या २०० आणि ५०० रुपये चलनाच्या बनावट नोटा आणि २ लाख ४ हजारांच्या खऱ्या नोटाही जप्त केल्या. पोलिसांनी प्रिंटर, इंटरनेट राउटर्स, शाई, काही रसायने आणि इतर उपकरणे जप्त केली. हे संशयित बनावट नोटांचा स्पर्श खऱ्या नोटांसारखा वाटावा म्हणून त्या काही रसायनांमध्ये बुडवत होते.
तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी येरवडा येथील ३५ वर्षीय महिला, चिंचवड येथील ३८ वर्षीय महिला, गहुंजे येथील सचिन रामचंद्र यमगर, लोहगाव येथील नरेश भिमप्पा शेट्टी आणि विश्रांतवाडी येथील प्रभू गुगल जेड्डी यांना अटक केली. या बनावट नोटा तयार करून बाजारात पुरवणारा मुख्य सूत्रधार शेट्टी होता.
या वर्षाच्या सुरुवातीस, शेट्टी आणि इतरांनी सोशल मीडियावर जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये त्यांनी बनावट नोटा खरेदी केल्यास भरघोस नफा मिळेल, असे सांगितले होते. या जाहिरातीत एक फोन नंबरही होता. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. अटक केलेले पुरुष आणि महिला आरोपी एकमेकांशी संवाद साधून हे बनावट चलन रॅकेट चालवत होते. ते एकमेकांशी मेसेद्वारेही संवाद साधत नसल्याचे तपासात आढळले आहे. पोलीस आता त्यांचे सोशल मीडिया हँडल्स तपासून ते कोणाशी संपर्कात होते आणि आणखी कुठे त्यांनी बनावट नोटा विकल्या, याचा तपास सुरू आहे.
सोशल मीडियावरून ओळख
यातील दोघा महिला आरोपींची शेट्टीशी सोशल मीडियावरूनच ओळख झाली होती. त्यांनी एक लाख रुपये देऊन दोन लाखाच्या बनावट नोटा खरेदी केल्या होत्या. या नोटा प्रत्यक्ष चलनात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी त्यापुढे कोणाकोणाला दिल्या, याचाही तपास केला जात आहे.





