पुणे : सिंहगड कॉलेज परिसरामध्ये दहशत पसरविणाऱ्या व हत्याराने वार करून जखमी करणार्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ज्या कॉलेजच्या परिसरात त्याने दहशत माजविली होती. त्याच परिसरात पोलिसांनी त्याची धिंड काढली. तन्मय सखाराम भुसारी (वय २०, रा. सिंहगड कॅम्पस, वडगाव, मुळ रा. बुलढाणा) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत रिहान महंमद होडगी (वय १८, रा. आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. रिहान हा पूर्वी सिंहगड लॉ कॉलेजसमोरील समर्थ चहाच्या टपरीवर काम करीत होता. दि. ८ एप्रिलला पहाटे साडेचार वाजता तो रिक्षा घेऊन निघाला. चहा पिण्यासाठी तो समर्थ चहाची टपरीवर गेला तेथे त्याच्या तोंड ओळखीचे तन्मय भुसारी व ज्ञानेश्वर हे दोघांबरोबर भांडणे करीत होते. तेव्हा त्याने तन्मय भुसारी याला कशाला भांडणे करता, असे विचारले. यावर तन्मय याने तु मला मारणार का, असे म्हणून धारदार हत्याराने रिहान याच्यावर वार केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत करीत तन्मय भुयारी याला दि. १२ एप्रिलला अटक केली. तम्नय भुसारी याची दहशत संपविण्यासाठी ज्या ठिकाणी वार करण्याचा प्रकार घडला होता, त्या समर्थ चहाची टपरी परिसरात तन्मय भुसारी याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी फिरविले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांनी केली.