Pune Accident – नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल पिगारासमोर अपघात घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजता मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर पिकअप वाहन चालक महादेव उत्तम शेंडे ( २२) हे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरचे चालक इम्रान अब्दुल जमादार याने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पिकअप पुढील टाटा आयशर वाहनावर आदळले. अपघातात महादेव शेंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबतचे सुमित दत्तू कांबळे ( २२, रा. वरकुटे, ता. इंदापूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना सिंहगड रोडवरील मोरया हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर पिकअप मधील आंब्यासह इतर फळे रस्त्यावर विखुरल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तिन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली. तसेच रस्त्यावर पडलेला फळांचा साठा हटवण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली. जखमी सुमित कांबळे यांच्या फिर्यादीवरून नऱ्हे पोलीस तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी दिली.