Pune: यंदा घडावी ‘अपघात मुक्त वारी’; पुणे आरटीओचा संकल्प

पुणे – अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या आषाढी वारीच्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाची वारी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून “अपघात मुक्त वारी’ करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.
आषाढी वारीबरोबर वाहनांची संख्याही अधिक असते. यंदा 28 जून रोजी संत तुकाराम महाराज तर 29 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरवात होणार आहे. दरम्यान, पालखी सोहळ्यात दरवर्षी दिंड्यांमध्ये वाहन शिरल्यामुळे अपघात, वारकऱ्यांचा टेम्पोला अपघात यासह अन्य अपघाताच्या घटना घडतात.
गतवर्षी (10 जून 2023) जेजुरी येथे वारकऱ्यांच्या एसटीला अपघात झाल्याची घटना घडली. तर 2022 मध्ये मिरज-पंढरपूर महामार्गावर केरेवाडी येथे पिकअप दिंडीमध्ये घुसल्यामुळे वारकरी जखमी झाली. हे अपघात रोखण्यासाठी आरटीओ प्रशासनाकडून वारीत सहभागी होणारे ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर यासह कारची फिटनेस तपासणी केली जाते.
तरीही वारी मार्गावर येणाऱ्या वाहनांमुळे अपघात घडतात. हे अपघात रोखण्यासाठीच पुणे आरटीओने ठोस पावले उचलत पुणे पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने अपघात मुक्त वारीचा संकल्प केला आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असल्याचे अर्चना गायकवाड यांनी सांगितले.
वारी मार्गावर प्रत्येक तालुक्यात आरटीओचे नोडल अधिकारी आहेत. त्यांच्या मदतीने आणि पोलिसांच्या सहकार्याने वारी मार्ग, मार्गाला जोडणारे रस्ते, उड्डाणपुल तसेच अपघाताची ठिकाणे याठिकाणी कर्मचारी तैनात करून दिंड्यांना सूचना देण्यात येणार. तसेच अपघातमुक्त वारीसाठी पालखी सोहळ्यात जनजागृतीही करण्यात येणार आहे.
“पुण्यातून निघालेल्या सर्व पालखी आणि दिंड्या सोलापूर जिल्ह्यात येतात. त्यामुळे गतवर्षी सोलापूरमध्ये अपघात मुक्त वारी राबविली आणि ती यशस्वी झाली. त्याच धर्तीवर पुणे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पुण्यातही अपघातमुक्त वारी राबविण्यात येणार आहे.” अर्चना गायकवाड – पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी





