प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शिवशक्ती कॉर्नरजवळ भरधाव वेगाने चाललेल्या एसटी बसने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसटी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. यात रिक्षातील चौघे जण जखमी झाले असून रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. नितीन नागोराव चंदनशिव (वय.४९, रा. सोरतापवाडी ता. हवेली), सज्जाद इलीयास (वय. ३०), मोहम्मद अकबर सागीर (वय २३) व मोहम्मद इलीयास शहजाद (वय.३५, सर्व रा. पुणे), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एसटी बस चालक किरण रावण दुवे (लातूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी चंदनशिव हे एक रिक्षाचालक असून हडपसर ते उरुळी कांचन यादरम्यान प्रवासी वाहतूक करतात. चंदनशिव हे रिक्षात कुंजीरवाडी येथून प्रवासी घेऊन हडपसरच्या दिशेने चालले होते. महामार्गावरून जाताना त्यांची रिक्षा शिवशक्ती कॉर्नरजवळ आली. तेव्हा त्यांच्या रिक्षाला एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात रिक्षातील प्रवासी व फिर्यादी चंदनशिव हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, हवालदार मंगेश नानापुरे, बालाजी बांगर व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. घटनास्थळावरील वाहतूककोंडी सुरळीत करून महामार्ग मोकळा केला. याप्रकरणी नितीन नागोराव चंदनशिव यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निलेश कोल्हे करीत आहेत.