पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील सर्पोद्यानातील सरपटणाऱ्या प्राण्यांचे नवीन जागेत स्थलांतर केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे २ एकर जागेत महापालिकेकडून मागील तीन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. मात्र, या कामासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने हे काम रेंगाळले होते. मात्र, या कामास गती देण्याचा निर्णय घेत महापालिकेकडून हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तब्बल ४८ कोटींचा निधी देण्यास शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यत दिली आहे. त्यामुळे या कामाला गती मिळणार आहे. महापालिकेच्या कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. या संग्रहालयात सपरटणाऱ्या प्राण्यांसाठी स्वतंत्र विभाग असून, त्यात वेगवेगळे साप, अजगर, सरडे, कासव, मगरींच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यांना सध्या बंदिस्त जाळीचे पिंजरे आणि जुन्या प्रकारच्या बांधकामांत ठेवले जात आहे. हे प्राणी सध्या सुमारे २० गुंठे जागेत असून, त्यांच्या अधिवासाची जागा अतिशय कमी आहे. त्यामुळे अनेक प्राणी दाटीवाटीने आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता महापालिकेकडून सुमारे २ एकर जागेत या सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी अधिवास निर्माण केला जाणार आहे. त्यासाठीची जागाही मोठी असून, त्या ठिकाणी जास्तीत जास्त नैसर्गिक अधिवास निर्माण करून त्यांना ठेवले जाणार आहे. मागील तीन वर्षांपासून हे काम निधी नसल्याने तुकड्या तुकड्यात केले जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांनी या प्राणी संग्रहालयास भेट दिल्यानंतर या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला होता.तसेच, अर्धवट कामे तत्काळ पूर्ण करण्यासाठी निधीचा प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार उद्यान विभागाकडून ठेवलेल्या या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.