पुणे : एमआयडीसीतील नोकरदार वर्गाला सुद्धा वाहतूक कोंडीच्या समस्येला रोज सामोरे जावे लागते. नोकरदार वर्गाचा नोकरीसाठी दिवसाचा प्रवासाचा वेळ सुमारे दोन ते चार तासांचा आहे. वाहतूक कोंडीमुळे त्यांचा वेळ वाया जात आहे. या पार्श्वभूमीवर आता वॉक टू वर्क या संकल्पनेला गती देण्याच्या सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. त्यासाठी एक आराखडा तयार करण्याच्या सूचनाही नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. परदेशांमध्ये वॉक टू वर्क ही संकल्पना यापूर्वीच अस्तित्वात आली आहे. वॉक टू वर्क म्हणजे घरापासून नोकरीच्या ठिकाणी चालत जाणे, कंपनी आणि घर यातील अंतर कमी असल्याने नोकरदार वर्गाला सहज चालत कंपनीपर्यंत पोहोचता येईल. पुणे जिल्हा हा उद्योग व्यवसायात अग्रेसर आहे. पिंपरी- चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर पुणे शहरातही आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. खेड तालुक्यात चाकण येथे एमआयडीसी आहे. त्याचबरोबर मावळमधील तळेगाव, शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे एमआयडीसी आहेत. या जिल्ह्यातील मोठ्या एमआयडीसी आहेत. त्याचबरोबर हिंजवडी येथे आयटी कंपन्या आहेत, तसेच दौंड, जेजुरी आणि मुळशी येथील पिरंगुट परिसरातहीऔद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे या परिसरातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग काम करतो. या सर्वच नोकरदार वर्गाला वाहतूक कोंडीच्या समस्येच्या त्रासाला सामोरे जावे लागते. प्रामुख्याने शहरातून मोठा वर्ग या कंपन्यांमध्ये कामाला आहे. त्यामुळे त्यांना शहरातून प्रवास करत शहराबाहेर असलेल्या या कंपन्यांमध्ये जावे लागते. त्यासाठी प्रवासामध्ये त्यांचा बराच वेळ खर्ची पडतो. वाहतूक कोंडीच्या या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात सरकारला अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे शासनाने आता वॉक टू वर्क या संकल्पेनाला गती देण्याचे धोरण स्वीकारले आहे. नुकतेच नगरविकास विभागाने एक परिपत्रक काढून वॉक टू वर्कला चालना देण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. काय करणे आवश्यक औद्योगिक क्षेत्रालगतच्या जागेवर रहिवास वापरास परवानगी देणे. उद्योगांच्या जवळपासच रहिवाशांसाठी घरे बांधणे, यासह म्हाडामार्फत कामगारांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. घरे, शाळा या औद्योगिक क्षेत्रांच्या परिसरात उभारल्या, तरच वॉक टू वर्क ही संकल्पना अस्तित्वात येईल. वॉक टू वर्कमुळे होणारे फायदे – प्रवासामध्ये जाणारा वेळ वाचेल – पायाभूत सुविधांवरील ताण कमी होईल. – वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होईल.