पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) अभि-एअरपोर्ट (एअरपोर्ट बस फॉर बिझनेस अँड हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटी) एसी ई-बस सेवा 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा मार्गांवर आणि नियमित तिकीटामध्ये ही बस सुरू करण्यात येणार आहे.
लोहगाव विमानतळावरून अभि-एअरपोर्ट बस सेवेचे मार्ग बिझनेस व हॉटेल इंटर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्वी एअरपोर्ट मार्गावर धावणाऱ्या बसचे विशेष तिकीट दर आकारण्यात येत होते. हे दर जास्त असल्यामुळे बसला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नव्हता. ही गोष्ट लक्षात घेऊन पीएमपीचे नवीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी तिकीट दर व बस फेऱ्यांचे नव्याने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नियमित दरामध्ये येत्या शुक्रवारपासून सहा मार्गांवर अभि-एअरपोर्ट बस धावणार आहे. या बस प्रत्येक बस थांब्यावर उभ्या राहतील. या मार्गावर धावणाऱ्या सर्व बस या एसी ई-बस असणार आहेत. सहा मार्गांवर बसच्या 62 फेऱ्या होणार आहेत.
मार्गाचे नाव आणि मार्ग
हिंजवडी, माण फेज 3 ते विमानतळ – शिवाजी चौक, पुणे विद्यापीठ गेट, मनपा भवन, पुणे स्टेशनमार्गे
भेकराईनगर (हडपसर) ते विमानतळ – हडपसर गाडीतळ, मगरपट्टा, खराडी बायपास चौक, हयात हॉटेल
स्वारगेट ते विमानतळ – पूलगट, वेस्टएन्ड टॉकीज, पुणे स्टेशन, ब्ल्यु डायमंड हॉटेल, शास्त्रीनगर चौक
कोथरूड स्टॅण्ड ते विमानतळ – गुडलक चौक, लोकमंगल, मनपा भवन, पुणे स्टेशन, ब्ल्यू डायमंड हॉटेल, गोल्फ क्लब
निगडी ते विमानतळ – चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, लांडेवाडी कॉर्नर, भोसरी, मॅग्झीन चौक, विश्रांतवाडी
निगडी ते विमानतळ – चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, वाकडेवाडी, पुणे स्टेशन, शास्त्रीनगर रोड, हयात हॉटेल