Pune : दर वर्षाला होताहेत एक हजार आत्महत्या!

पुणे : शहरात गेल्या चार वर्षांत तब्बल ३,९६१ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. लॉकडाउननंतर आर्थिक संकटातून आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या जास्त आहे. तर, कौटुंबिक वादातून महिलांनी आत्महत्या केलेल्या दिसून येतात. कौटुंबिक वादातून पुरुषांनी आत्महत्या केलेल्या घटनाही दखलपात्र आहेत. चार वर्षांत २,८४९ पुरुषांनी तर १,१७३ महिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. शिरीष महाराज मोरे, त्या पाठोपाठ खडकीतील फौजदार आणि त्यापाठोपाठ शनिवारी एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना उजेडात आल्या. त्यातील एकाने घटस्फोटाच्या तगाद्याने न्यायालय आवारात गळफास घेतला, तर दुसऱ्या तरुणाने प्रेमभंगातून पोलीस लाइनमधील घरात आत्महत्या केली. त्यावरून आत्महत्यांच्या वाढत्या घटना चर्चेचा विषय बनल्या आहेत.
करोनानंतर वाढलेल्या ताण तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. पुणे शहरातच नव्हे, तर देशभर एक प्रकारे आत्महत्यांची सुप्त लाटच पसरली आहे. देशाचा विचार करता दरवर्षी दोन लाख व्यक्ती आत्महत्या करतात. यातील निम्म्या आत्महत्या या १५ ते ३५ वयोगटातील असतात. करोना साथीनंतर जे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर समाजातील आणि कुटूंबातील ताण-तणाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
काही वर्षांपपूर्वी विवाहितेची आत्महत्या किंवा दहावी बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, अशा घटना वाचनात येत होत्या. आता मात्र सर्रास शहरातच दिवसाला एक ते तीन जणांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. याची वेगवेगळी कारणेही समोर येत आहेत. पूर्वी कौटुंबिक छळातून फक्त महिला आत्महत्या करत होत्या. आता मात्र पत्नीने आणि पत्नीच्या नातेवाईकांनी त्रास दिला म्हणून वर्षातून किंमान सहा-सात पुरुषांनी आत्महत्या केल्याचे समोर येते आहे. त्यापाठोपाठ आत्महत्येमागे मानसिक स्वास्थ्य, आजारपण अशी कारणेही दिसून येत आहेत.
मोबाइल अॅपही होते जबाबदार
दोन एक वर्षांपूर्वी कर्जपुरवठा देणारे अनेक मोबाइल ॲप आले होते. याव्दारे सहजा सहजी छोटे कर्ज मिळत होते. मात्र, कर्ज परतफेड न केल्यास संबंधित कर्जदाराचे व्हिडिओ किंवा छायाचित्रे मॉर्फ करुन बदनामी केली जात होती. तसेच व्याजही मोठ्या प्रमाणात वसूल केले जात होते. यामुळेही देशभरात अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने लक्ष घालून अशा ॲपना चाप लावला. यामुळे हे सत्र थांबले.
जवळच्या व्यक्तीची भावनिक अवस्था ओळखावी
अभ्यास असे सांगतो की, आत्महत्या करण्यापूर्वीच्या आठवड्यात बहुतांश लोक हे आपल्या जवळच्या व्यक्तीकडे थेट किंवा अप्रत्यक्षपणे आत्महत्येचा विचार बोलून दाखवतात. अत्यंत तणावाच्या वेळी स्वत:ला इजा करुन घेण्याचे विचार ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांच्या मनात येत असतात. यामुळे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची भावनिक अवस्था ओळखली तरीही अनेक आत्महत्या टळू शकतात.
पुण्यातील आत्महत्येची आकडेवारी
वर्षे स्त्री पुरुष मुली मुले एकूण
२०२१ ३५४ ६२८ ४२ ५६ १,०८०
२०२२ २४२ ७५४ २९ ३१ १,०५६
२०२३ १९६ ७३२ ४९ ४६ १,०२३
२०२४ २०६ ५८३ ४३ ३० ८६२





