पुणे – ऍमेनिटी स्पेससाठी महापालिकेचे नवीन धोरण

पुणे – सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) म्हणून महापालिकेच्या ताब्यात येणाऱ्या जागांचा बहुद्देशीय वापर व्हावा या उद्देशाने महापालिकेकडून या जागा वापराबाबत नव्याने धोरण केले जाणार आहे. सध्या या जागा काही मोजक्‍याच कारणास्तव वापरल्या जातात. त्यामुळे त्याचा हवा तसा वापर तसेच त्याचा नागरिकांना फारसा उपयोगही होत नाही ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या जागा वापराच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली.

महापालिकेस मोठ्या बांधकाम प्रकल्पांना मान्यता देताना, काही जागा सेवा क्षेत्र म्हणून पालिकेच्या ताब्यात मिळते. मात्र, अनेकदा हे क्षेत्र अतिशय कमी असते. यामुळे या क्षेत्राचा नागरिकांच्या फायद्यासाठी वापर करणे प्रशासनास शक्‍य होत नाही. तर उपलब्ध असलेल्या जागांवर शाळा, व्यायामशाळा, उद्यान, समाज मंदीर, अग्निशमन केंद्र अशापैकी काही मोजकेच प्रकल्प उभारले जातात. मात्र, मुळातच जागा कमी असल्याने त्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या सेवा तकलादू ठरतात, तसेच त्याचा फारसा फायदा नागरिकांना होत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून या जागांचा व्यावसायिक वापर करून त्या भाडेकराराने दिल्यास पालिकेस उत्पन्न मिळण्याची शक्‍यता असल्याने त्यांचा वापर बहुद्देशीय करता येईल का याबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठीचे धोरण मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून तयार करण्यात येत असून लवकरच ते ऍमेनिटी स्पेस समितीच्या मान्यतेसाठी ठेवले जाणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. या धोरणास मान्यता मिळाल्यास पालिकेकडे वर्षानुवर्षे धुळखात पडून असलेल्या जागांचा वापर सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार असून वापर सुरू झाल्यास त्यावर होणारे अतिक्रमणही थोपविणे आपोआपच शक्‍य होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×