Pune : गुंगारा देणारा मोक्कातील सराईत गुंड गजाआड

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईताला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
फिरोज कुतुब खान (वय २६, रा. विमाननगर) असे आरोपीचे नाव आहे. खान सराईत असून, त्याच्यासह साथीदारांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी मोक्काअन्वये कारवाई केली होती.
त्यानंतर खान पसार होता. गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. खान विमाननगर भागातील एसआरए बिल्डिंग परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी शैलेश नाईक आणि रुपेश पिसाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.
पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली साेनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक निरीक्षक विजय चंदन, पिसाळ, नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरिप्रसाद पुंडे, लालू कऱ्हे यांनी ही कामगिरी केली.





