Pune: निवडणुकीत 599 एसटी बसचा ताफा

पुणे – लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर आणि मावळ या मतदार संघात मतपेट्या वाहून नेण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) ५९९ बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एसटीकडून बस पुरविण्याची तयारी केली जात आहे.
लोकसभा, विधानसभा, महापालिकेच्या मतदानासाठी पीएमपीकडून मतपेट्या वाहून नेण्यासाठी प्रत्येक वेळी बस पुरविण्यात येतात. त्यासाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदार केंद्रानुसार एसटी प्रशासनाकडे किती बस लागतील, याची माहिती देतात. त्यानुसार एसटी महामंडळाकडून मत पेट्या वाहून नेण्यासाठी मागणीनुसार बस पुरविल्या जातात. यावेळी लोकसभेचे मतदान पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यात होणार आहे. बारामती मतदार संघासाठी सात मे रोजी होणार आहे.
तर, १३ मे रोजी पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. पुणे लोकसभा मतदार संघ हा शहरात येतो. तसेच, मावळ, शिरूर आणि बारामतीचा काही भाग शहरात येतो. त्यापैकी ३९० एसटी बस बारामती मतदार संघासाठी दिल्या जाणार आहेत. तर, २०९ एसटी बस शिरूर व मावळ मतदार संघासाठी दिल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आले आहे.





