पुणे : एकमेकांच्या अंगावर गुलाल टाकत असताना, तो मंदिरातील दिव्यावर पडून भडका उडाला. त्यामध्ये एका चौदा वर्षीय मुलाला भाजल्याने गंभीर दुखापत झाली. दरम्यान, मुलाचे नातेवाईक मदिरात हजर होते. त्यांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मयांक कुनाल कालेकर (१४, रा. गोखलेनगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी, चतुःशृंगी पोलिसांनी मयांक याच्या दुखापतीस नवनाथ जाधव (५५ ) आणि विजय शिंदे (३८, रा. रामोशीवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कुनाल विनोद कालेकर (३९) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास रामोशीवाडी येथील वेताळ महाराज पालखी विसावा मंदिरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुनाल हे पेटिंगचा व्यवसाय करतात. रविवारी रात्री त्यांची मुले मयांक आणि निनाद हे दोघे वेताळ महाराज पालखी विसावा मंदिरात भजनाच्या कार्यक्रमास गेली होती. मंदिराच्या हॉलमध्ये १५ ते २०, तर बाहेर ४० ते ५० नागरिक उपस्थित होते. रात्री अडीच वाजताच्या सुमारास पालखी उचलण्याच्या कार्यक्रमाच्यावेळी नवनाथ जाधव याने विजय शिंदे याच्या अंगावर गुलाल टाकला. त्या वेळी शिंदे हा दारूच्या नशेत होता. त्याने रागात मंदिरातील प्लॅस्टिकच्या पिशवीतील गुलाल जाधव याच्या अंगावर टाकला. मात्र, हा गुलाल मंदिरातील दिव्यावर पडला. गुलालात असलेल्या केमिकलमुळे मोठा भडका झाला. त्यामध्ये फिर्यादींचा मुलगा मयांक याच्या अंगावरील शर्टाने पेट घेतला. त्याच्या डोक्याचे केस जळाले, तर हाताचा पंजा आणि गालालाही भाजले. फिर्यादींचे दाजी या वेळी मंदिरात होते. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी प्रसंगावधान राखत मयांकला जवळील कपड्याच्या साह्याने गुंडाळले. त्यामुळे आग विझली. या घटनेत मयांक १८ टक्के भाजला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.