पुणे : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून खासगी पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यातून आतापर्यंत ९ हजार ४०२ पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी केलेली आहे. राज्यात पूर्व प्राथमिकच्या अनेक खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलांना योग्य त्या सोयीसुविधा आहेत का? पाल्यांसाठी तिथले वातावरण कसे आहे, याची माहिती मिळावी म्हणून शिक्षण विभागाने गेल्या महिन्यापासून शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेताना अनेक पालक ती शाळा अधिकृत आहे का नाही याची चौकशी करीत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. पालकांनी संबंधित शाळेविषयी संपूर्ण माहिती घेऊनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. याबरोबरच शाळेचा परिसर स्वच्छ असावा, पाल्यांना आरामदायक खुर्च्या, टेबल असावेत, शैक्षणिक खेळणी असावीत. शाळेची इमारत हवेशीर असावी, पुरेसा सूर्यप्रकाश असणे गरजेचे आहे. शाळेतील शिक्षकांचे शिक्षण किती झाले आहे, फी किती घेतली जाते, शाळा नोंदणीकृत आहे का, हे पालकांच्या पर्यायाने बालकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यामुळे शासनाने या खासगी पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खासगी केंद्रांनी सविस्तर माहिती भरण्याबाबतचे बंधनही घालण्यात आले आहे. पूर्व प्राथमिकच्या शाळांचे प्रकार अनेक आहेत ज्याला डे केअर सेंटर, मॉन्टेसरी शाळा, बालवाडी, खेळण्याची शाळा, नर्सरी स्कूल, शिशू विहार अशी अनेक नावेदेखील देण्यात आली आहेत. केजी शाळांची जिल्हानिहाय झालेली नोंदणी पुणे- १,५९५, ठाणे-९५१, अहिल्यानगर-५७६, नागपूर ५२५, मुंबई महापालिका अंतर्गत- ३०९, मुंबई शिक्षण उपसंचालक अंतर्गत-२२, नाशिक- ३७१, नांदेड- २११, कोल्हापूर- ३५८ याप्रमाणे जिल्हानिहाय नोंदणी झालेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २०० पेक्षा कमी शाळांची नोंदणी झाली आहे.