Pune : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ५४ कोटी

पुणे : राज्यातील अल्पसंख्याक समाजातील वैद्यकीय, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात, तसेच इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ५४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालय संचालक यांच्या पत्रान्वये करण्यात आलेल्या मागणीस अनुसरून संबंधित कार्यालयास शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ व सन २०२४-२५ मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी निधी देण्यास मंजुरी मिळाली आहे.
पाचही शैक्षणिक वर्षांतील शिष्यवृतीसाठी पात्र ठरलेल्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना शिष्यवृती वितरीत करण्यासाठी ही रक्कम तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक यांच्या स्वाधीन करण्यात येत असून, संचालक हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील.
पात्र ठरलेल्या ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित आहे अशा विद्यार्थ्यांची प्रलंबित रक्कम वितरीत केलेल्या निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात आली आहे. रकमेतून प्रलंबित रक्कम वितरीत केल्यानंतर तरतूद शिल्लक राहिल्यास ती सन २०२४-२५ च्या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीसाठी उपयोगात आणली जाणार आहे.





