Pune : खडकवासला प्रकल्पात ५२.६१ टक्के पाणीसाठा
Updated On:

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात ५२.६१ टक्के म्हणजे १५.३४ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच शेतीला सुध्दा याच प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते. सद्यस्थितीत शेतीसाठी कालव्यातून १ हजार १०३ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात करणार नसल्याचे स्पष्ट केले. उपलब्ध पाणीसाठ्याचे जुलै अखेरपर्यंतचे नियोजन करण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले होते.
सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरणात १.३९ टीएमसी, पानशेत धरणात ६ टीएमसी, वरसगावमध्ये ७.५१ टीएमसी आणि टेमघर धरणात ०.४४ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.





