Pune : व्हॅलेंटाईन डेचा मुहुर्त साधण्यास ३५ युगुल सज्ज

पुणे : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. दि. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. हा मुहुर्त साधत लग्न करण्यास प्रेमी युगुल प्राधान्य देतात. शुक्रवारी (दि. १४) नोंदणी पध्दतीने विवाह करण्यासाठी शहर विवाह नोंदणी कार्यालयात सुमारे 35 प्रेमी युगुलांनी पूर्वनोंदणी केली आहे.
व्हॅलेंटाईन डे दिवशी लग्न करण्यासाठी सुमारे एक-दिड महिन्यांपूर्वीच पूर्व नोंदणी शहर विवाह नोंदणी कार्यालयात करण्यात आली आहे. दि. १४ फेब्रुवारीला फोटोझिंको येथील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पध्दतीने विवाह करण्यासाठी मोठी गर्दी होते. यंदा सुमारे 35 प्रेमी युगलांनी पूर्व नोंदणी केली असल्याची माहिती विवाह नोंदणी कार्यालयाकडून देण्यात आली.
नोंदणी पद्धतीने विवाह (रजिस्टर्ड मॅरेज) करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. या फोटोझिंको कार्यालयाच्या जवळील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह विशेष विवाह कायद्यानुसार होतात. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रियाही नसल्याने नोंदणी करून विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. विवाहाचे प्रमाणपत्रही लगेच देण्याची व्यवस्था कार्यालयात करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.





