पुणे – यादीतून नाव गायब झाल्याच्या 30 तक्रारी

पुणे – मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारयादीतून अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावेळी याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. यावेळी मतदारयादीतून नाव वगळ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पूर्णप्रक्रियेचे पालन केले. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीतून नाव गायब झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे फक्त 30 प्राप्त झाल्या आहेत.

2014 ची लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्याच्या प्रकारावरून विशेष गाजली. यामध्ये सर्वपक्षीय नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच, फेर मतदान घेण्याची मागणी केली होती. यावेळी सुमारे 1 लाखापेक्षा अधिक मतदारांची नावे मतदारयादीतून परस्पर डिलीट केल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला होता. यावर काही मतदारांनी उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विशेष कक्षाची स्थापना करून मतदारांची नावे डिलिट झाली आहेत. अशा तक्रारी द्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे सुमारे 1 हजार 500 मतदारांनी मतदारयादीतून नाव डिलिट केल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम घेऊन सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली होती. यावेळी ही जिल्हा प्रशासनाने असे प्रकार टाळण्यासाठी यंदा खात्री करून सर्व प्रक्रियेचे पालन करून मतदार यादीतून मयत असलेली सुमारे 50 हजार मतदारांची नावे वगळली. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाकडे फक्‍त 30 मतदारांनी नावे नसल्याच्या प्राप्त झाल्या. यातील तक्रारींची शहानिशा केल्यानंतर यातील आठ मतदारांची नावे मतदार यादीत सापडली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

“त्या’ मतदारावर होणार गुन्हा दाखल
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील एसएसपीएमएस स्कूलमधील मतदान केंद्रांवर एका मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान दिले त्या उमेदवाराऐवजी दुसऱ्याच मतदाराचे चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसत असल्याची तक्रार संबंधित मतदान केंद्राध्यक्ष यांच्याकडे केली. यावर याची शहानिशा केली असता त्या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली असून संबंधित मतदारावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

संवेदनशील मतदान केंद्रांवर “नजर’
पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 153 मतदान केंद्रे संवेदनशील होती. या मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, या मतदान केंद्रावर सुक्ष्म निरिक्षकांची नेमणूकही केली होती. त्याचबरोबर या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. त्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती. तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.