पुणे -कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दि.26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 2 लाख 75 हजार 428 मतदार तर चिंचवड मतदारसंघात 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. तर दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण 780 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून कसबा मतदारसंघात 270 मतदान केंद्र, तर चिंचवडमध्ये 510 मतदान केंद्र आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी दिली. कसबा पेठ व चिंचवड मतदारसंघासाठी दि.7 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान, कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2022 पासून राबवण्यात आला. यानुसार 5 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार – चिंचवड विधानसभा मतदार संघात 3 लाख 1 हजार 648 पुरुष, तर 2 लाख 64 हजार 732 महिला आणि 35 तृतीयपंथी मतदार याप्रमाणे एकूण 5 लाख 66 हजार 415 मतदार संख्या आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत 48 हजार 106 ने वाढ झाली आहे. कसबा पेठेत मतदार घटले कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 1 लाख 36 हजार 873 पुरुष मतदार तर 1 लाख 38 हजार 550 महिला मतदार आणि 5 तृतीयपंथी मतदार याप्रमाणे एकूण 2 लाख 75 हजार 428 मतदार संख्या आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत 15 हजार 255 ची घट झाली आहे.