निवडणुकीच्या नियोजनासाठी महापालिकेची कसरत पुणे : राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेची निवडणूक घोषित केली आहे. या निवडणूकीच्या तयारीसाठी महापालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे. या निवडणूकीसाठी महापालिकेने तब्बल २३ हजार ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुमारे ४ हजार मतदान केंद्र असणार असून या निवडणूकीसाठी सुमारे ४ हजार ४०० कंट्रोल युनीट तर १३ हजार २०० बॅलेट युनिटची गरज असणार आहे. याशिवाय, १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सुमारे १५०० अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई यांची नेमणूक होणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. या निवडणूक नियोजनासाठी आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुख निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक नियोजनाची माहिती दिली. घरातून मतदान नाही विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने बेडवर असलेले तसेच उठता न येणाऱ्या आणि ८० वर्षांच्या पुढील ज्येष्ट नागरिकांसाठी घरी जावून मतदान प्रक्रिया राबविली होती.मात्र, महापालिका निवडणुकीसाठी त्याबाबत काहीच सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे अशा मतदारांना मतदान केंद्रावरच यावे लागणार आहे. महापालिका निवडणुकासाठी ९०० मतदारांचे एक केंद्र असणार असून मोठया सोसायटयांमध्ये सोसायटीच्या आतच केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाकडे मागणी केली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सर्व मतदारकेंद्र ही तळमजल्यावरच असतील, अशा पध्दतीने निश्चित केली आहेत. आता पर्यंत ७० टक्के केंद्र अंतिम झाली आहेत. या निवडणूकीसाठी एकूण ३५ लाख ५१ हजार ८५४ मतदार असून त्यात १८ लाख ३२ हजार ४४९ पुरूष तर १७,१९,०१७ स्त्री मतदार असणार असून ४८८ इतर मतदार आहेत.