पुणे : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे हे त्यांचे कुटुंब आणि मित्रांचे कुटुंब असे २२ जण एकत्र जम्मू काश्मीरला गेले होते. मात्र, पहलगामला जाण्यापूर्वी त्यांच्या रस्त्यावर भूस्खलन झाल्याने त्यांना माघारी फिरावे लागल्याने हे २२ जण दहशतवादी हल्ल्यातून बचावले आहेत. हे सर्वजण बुधवारी सायंकाळी पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत, तर दुर्घटनेनंतर पारगे यांनी व्हिडिओद्वारे सोशल मीडियावरही आपल्यावर ओढावलेल्या या प्रसंगाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रामधून विशेषत: पुण्यामधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक जम्मू- काश्मीरला गेले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत. अनेक जण पुन्हा परत आपापल्या घरी येण्यासाठी निघाले आहेत. पारगे हे श्रीनगरला गेल्यानंतर त्यांनी सुरुवातीला टुलिप गार्डन, दाललेक, सोनमर्ग, गुलमर्ग पर्यटन केले. त्यानंतर, ते पहलगामला जाणार होते. ते अवघे ३०-४० किलोमीटरवर होते. मात्र, भूस्खलन झाल्याने त्यांना पहलगामला जाता आले नाही. त्यांना पुन्हा मागे यावे लागले. दरम्यान, त्यांना एक वाईट अनुभवाचाही सामना करावा लागला. भूस्खलन झाल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यांना ट्रॅव्हल चालकाने अडवणूक करीत घाटात गाडी उभी केली, तसेच त्यांच्याकडे १५ हजारांची मागणी केली. शेवटी नाइलाजास्तव पारगे यांनी ९ हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांना पुन्हा हाॅटेलवर सोडण्यात आल्याचे पारगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.