वारजे – टेकड्यांवर वणवा लागण्याच्या घटना वाढत असून, कर्वेनगर परिसरातील सर्व्हे नं. 14 वारजे वन उद्यान टेकडीला शुक्रवारी (दि. 3) आग लागली. वाऱ्यासह पसरलेल्या आगीत अनेक झाडे आणि प्राणीजीव जळाले. त्यावेळी कोथरूड आणि वारजे अग्निशामक दलाच्या जवानांकडून तात्काळ घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आग सर्वत्र पसरली. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. वारजे येथील कै. वसंत अर्जुन चौधरी अग्निशमन केंद्राची एक गाडी, कोथरूडची एक गाडी घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी वारजे वन उद्यान टेकडी आणि गांधी भवन डहाणूकर कॉलनी या परिसरातील टेकडीवरील आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांसह स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले. या आगीमध्ये वनविभागासह काही खासगी जागेतील दोनशेहून अधिक झाडे जळून गेली. तर वन्यप्राण्यांनाही आगीची झळ पोहचली. दत्तात्रय चौधरी यांच्यासह सिद्धेश्वर तरुण मित्र मंडळाचे गिरीश कुलथे, संकेत भोज, सुरज कुलथे, गणेश भंडारी, विकास जाधव, काळुराम गाडे, सोन्या रावळे, सिद्धेश बेदरे, वनरक्षक गौतम टांकनसार, सचिन मांडवकर, धर्मराज माने, हर्ष भंडारे, तानाजी जाधव, अक्षय गायकवाड, आप्पासाहेब मिसाळ, रुपेश जांभळे, दत्तात्रय शेटे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. त्यामुळे आगीपासून होणार नुकसान टळले.