Pune : मागितल्या २०० बसेस; मिळाल्या ३०

पुणे : पुणे विभागातील एसटी आगाराला अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नवीन बस मिळाल्या खऱ्या, मात्र त्यांची संख्या केवळ ३० आहे. त्याही बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन आगारांनाच या बस मिळाल्या असून, अन्य आगार अद्यापही प्रतिक्षेतच आहेत. एसटीच्या ताफ्यातील बसेसची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे प्रवाशांना सेवा देताना एसटी प्रशासनाला अडचणी येत आहेत. त्यामुळे २०० नवीन बस मिळाव्या अशी मागणी पुणे एसटी विभागाकडून करण्यात आली होती. मात्र त्यांच्या पदरात निराशा पडली आहे.
राज्यातील पुणे एसटी विभाग हा सर्वांत जास्त महसूल मिळवून देणारा विभाग आहे. या ठिकाणावरून राज्यासह राज्याबाहेर एसटीची सेवा दिली जाते. सवलतीमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत एसटी बसची संख्या कमी असल्याने मार्गाचे नियोजन करताना एसटी प्रशासनाची चांगलीच दमछाक होते. विभागात नव्याने तीस एसटी बस दाखल झाल्या. मात्र, विभागातील मुख्य आगार असलेल्या स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन यांसह अन्य आगारांना अद्यापही नवीन बसेसची वाट पहावी लागणार असे दिसते आहे.
स्वारगेट आणि शिवाजीनगर या मुख्य आगारातून लांब पल्ल्याच्या बस धावतात. मात्र, त्यातील काही बस ह्या जुन्या झाल्यामुळे वारंवार प्रवासामध्येच त्या बंद पडत आहेत. परिणामी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जुन्या बस चालविताना चालकांचीही चांगलीच कसरत होत आहे. त्यामुळे मुख्य आगाराला तात्काळ बस उपलब्ध व्हाव्या आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पुणे विभागाला २०० बसची गरज आहे, त्याबाबत प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आली आहे. त्यातील तीस बस मिळाल्या असून, अजून बस मिळण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. टप्प्या टप्प्याने या बसेस मिळणार आहे.
– प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक





