पुणे – ‘आरटीई’च्या प्रवेशासाठी 2 लाख अर्ज

आता पालकांना उत्सुकता प्रवेशाच्या लॉटरीची

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 टक्के प्रवेशासाठी राज्यातून 2 लाख 48 हजार 745 ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. शाळांच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे लॉटरी काढून प्रवेश निश्‍चित केले जाणार आहेत. त्यामुळे आता पालकांना प्रवेशाच्या लॉटरीची उत्सुकता लागली आहे.

पालकांना आपल्या मुलांचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी 5 ते 30 मार्च या कालावधीत मुदत देण्यात आली होती.”आरटीई’ प्रवेशासाठी 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 960 जागा दर्शविण्यात आल्या आहेत. या एकूण जागांपेक्षा जास्त दुप्पटीने अर्ज दाखल झाले आहेत. राज्यातील जिल्ह्यांचा विचार करता सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यासाठी तर सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सादर झाले आहेत. पुण्यात 16 हजार 623 जागांसाठी तिप्पटी पेक्षा जास्त म्हणजेच 54 हजार 443 अर्ज दाखल झाले आहेत. तर सिंधुदुर्गमध्ये 353 जागांसाठी केवळ 701 अर्ज भरण्यात आले आहेत.

ऑनलाइनद्वारे 2 लाख 47 हजार 790 तर मोबाईल ऍपद्वारे 955 अर्ज दाखल झाले आहे. पालकांनी मोबाइल ऍपद्वारे अर्ज भरण्याला फारसे प्राधान्य दिले नसल्याचेही आकडेवारीवरुन उघडकीस आले आहे.

राज्यातील सर्वच जिल्ह्यात प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे प्रवेश निश्‍चित करण्यासाठी लॉटरी पध्दत वापरण्यात येणार आहे. लॉटरीसह इतर पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही “आरटीई’ पोर्टलवर लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर “एसएमएस’द्वारे अर्ज भरल्यानंतरच्या कार्यवाहीची माहिती कळविण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक, भरलेला अर्ज क्रमांक, पासवर्ड प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

लॉटरी लागल्यावर पोर्टलवरुन प्राप्त शाळेच्या नावाच्या वाटप पत्राची प्रिंट पालकांना काढून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर दिलेल्या मुदतीत पडताळणी समितीकडून प्रवेशासाठीची सर्व कागदपत्रे तपासून घेणे बंधनकारक आहे. या तपासणीनंतर वाटप पत्रावर पडताळणी समितीची स्वाक्षरी व शिक्का घेणे आवश्‍यक असून यानंतर पालकांना प्रवेश प्राप्त शाळेत जाता येणार आहे. समितीकडून बालकांना शाळेत प्रवेश दिल्याची पावती पालकांना देण्यात येणार आहे. त्यानुसार पालकांनी त्यांना प्राप्त झालेल्या शाळेत दिलेल्या मुदतीत जाऊन प्रवेश घेण्याचीही सक्ती करण्यात आलेली आहे. पडताळणी समितीकडून तपासणी केल्याशिवाय शाळेत प्रवेश निश्‍चित होणार नाही, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय दाखल झालेले अंतिम प्रवेश अर्ज –
अहमदनगर- 5893, अकोला- 6493, अमरावती-8529, औरंगाबाद-14519, भंडारा-2466, बीड-5279, बुलढाणा-5410, चंद्रपूर-3707, धुळे-2391, गडचिरोली-1291,गोंदिया-2731, हिंगोली-2062, जळगाव-6952, जालना-6107, कोल्हापूर-2810, लातूर-4279, मुंबई- 11723, नागपूर-26263, नांदेड-8269, नंदूरबार-586, नाशिक-14995, उस्मानाबाद-2258,पालघर-1350, परभणी-2703, पुणे-54443, रायगड-6457, रत्नागिरी-991, सांगली-2185, सातारा-2436, सिंधुदुर्ग-701, सोलापूर-5165, ठाणे-16325, वर्धा-4043, वाशिम-1892, यवतमाळ-5041.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)