पुणे -क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून देण्याच्या या ऐतिहासिक घटनेला 175 वर्षे (शतकोत्तर अमृत महोत्सव) पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने फुले दाम्पत्याच्या या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण तसेच विकास करण्याकरिता राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माळी महासंघातर्फे रविवार दि. 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता फुले दांपत्य सन्मान महारॅली काढण्यात येणार आहे. श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) अशी रॅली असणार आहे. यावेळी महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित चित्ररथाची मांडणी करण्यात येणार आहे. ढोल-ताशा आणि लेझीम पथके, शंखनाद, आकर्षक फुलांची सजावट करून रॅली मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्यात येणार आहेत. अशी माहिती माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, महासंघाचे शहर अध्यक्ष दीपक जगताप यांनी दिली.