पुणे : या शैक्षणिक वर्षापासून अकरावीसाठी राज्यात केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील ११ हजार ७०० कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या १६ लाख ७६ हजार जागा उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक वर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया दिवाळीपर्यंत सुरु राहते. यंदा मात्र सर्व प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने ठेवले आहे. राज्यात आतापर्यंत पुणे आणि पिंपरी- चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात होती. त्या अंतर्गत सुमारे एक हजार ७३० महाविद्यालयांतील सव्वा सहा लाख जागांवर साडे चार लाख विद्यार्थी प्रवेश घेत होते. आता या शैक्षणिक वर्षापासून पूर्ण राज्यात केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया १९ मे पासून सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना एका अर्जाद्वारे राज्यातील कोणत्याही महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे उपस्थित होते. विभागीय शिक्षण उपसंचालक आणि संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या महाविद्यालयांनाच संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश द्यायचा असल्यास महाविद्यालयांना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मान्यता घ्यावी लागणार आहे. यामुळे मान्यता नसलेल्या किंवा अनधिकृतरीत्या अकरावी, बारावीला प्रवेश देणाऱ्या संस्थांना लगाम बसणार आहे.