पुणे-अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत ती गर्भवती होण्यास कारणीभूत ठरणाऱ्यास 15 वर्षे सक्तमजुरी व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी सुनावली. ऋषिराज बाबासाहेब शेळके (वय 22, रा. भांडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे.
दंडाची रक्कम 35 हजार रुपये आणि 1 लाख रुपये नुकसानभरपाई पीडितेला देण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात डीएनए चाचणीचा पुरावा महत्त्वाचा ठरला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. अरुंधती ब्रह्मे यांनी न्यायालयीन सुनावणीत पीडित अज्ञान असल्याचे, तिचा गर्भपात व रासयनिक प्रयोगशाळा तपासणीचा डीएनए अहवाल यावरुन आरोपीच गर्भाचा जनुकीय पिता असल्याचे युक्तीवादात सांगितले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
याप्रकरणी 17 वर्षीय पीडितेने येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी व पीडित मुलीची येरवडा येथील एका महाविद्यालयात ओळख झाली होती. सप्टेंबर 2017 मध्ये त्याने मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिला पुन्हा महाविद्यालयात सोडले. त्यानंतर थोड्याच दिवसांत मुलगी गर्भवती असल्याचे कुटुंबीयांना समजले व तिला खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात करण्यात आला.
मात्र, गर्भपाताची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला. त्यात तिने आरोपीमुळे दिवस गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन गर्भाचा डीएनए तपासणीस पाठवून खातरजमा केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांनी केला.