Pune : १२ हजार चौरस फूट जागा मिळावी

पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या ४ क्रमांकाच्या प्रवेशद्वारालगत उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीत वकिलांसाठी बारा हजार चौरस फूट जागा मिळावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांना निवेदन दिले. त्या वेळी उपाध्यक्ष अॅड. समीर भुंडे, अॅड. उमेश मांजरे, अॅड. सुजित घुमरे, अॅड. राकेश ओझा, अॅड. संदीप सावंत, अॅड. शिरीष जगदाळे, अॅड. राहुल नांगरे आदी या वेळी उपस्थित होते.
अॅड. झंजाड म्हणाले, नवीन इमारतीत १ लाख ३० हजार ते १ लाख ४० हजार चौरस फुटांचे बांधकाम होत आहे. त्यामध्ये, पुरुष व महिलांसाठी दोन हजार चौरस फुटांचे प्रत्येकी एक बार रूम आरक्षित करण्यात आली आहे. मागील काही वर्षांत न्यायालयात प्रॅक्टिस करणार्या वकिलांची संख्या वाढत आहे.
सद्यस्थितीत ती संख्या १५ हजारांवर गेली असून, भविष्यात ती वाढणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आरक्षित केलेल्या बार रूम अपुर्या पडणार आहे. भविष्यात वकिलांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने दोन बार रूमऐवजी दोन हजार चौरस फुटांचे चार बार रूम, बारचे कार्यालय, लॉकर्स, झेरॉक्स सेंटर व उपाहारगृहाची आवश्यकता आहे.
त्यादृष्टीने १२ हजार चौरस फुटांचे बांधकाम वकील वर्गासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याचे अॅड. झंजाड यांनी नमूद केले.





