पुणे – पुणे मेट्रोच्या विस्तार प्रकल्पांतर्गत पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या दोन मार्गांसाठी लवकरच १२ नवीन मेट्रो ट्रेन सेट पुणे मेट्रोच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या १२ नव्या ट्रेनसाठी टीटागढ रेल सिस्टिम लिमिटेड आणि टीटागढ फिरेमा या कंपन्यांना एकत्रितपणे ४३०.५३ कोटी रुपयांची खरेदी ऑर्डर देण्यात आली आहे. प्रत्येक मेट्रो ट्रेन सेटमध्ये तीन डबे असतील. हे सर्व ट्रेन सेट पूर्णतः मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत तयार करण्यात येणार असून, त्यांचे उत्पादन अल्युमिनियमपासून केले जाणार आहे. या ट्रेनही सध्याच्या मेट्रो ट्रेनप्रमाणे वातानुकूलित असतील. स्वयंचलित दरवाजे, उद्घोषणा आणि डिजिटल डिस्प्ले यांसारख्या आधुनिक सुविधा यात राहणार आहेत. पीसीएमसी ते निगडी या मार्गिकेचे काम सध्या वेगाने सुरू असून, स्वारगेट- कात्रज मार्गासाठी लवकरच ठेकेदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी आवश्यक असणाऱ्या नव्या ट्रेन सेटसाठी महा मेट्रोने आधीच खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्याने, बांधकाम पूर्ण होताच सेवा सुरू करणे शक्य होईल, असे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. या नवीन ट्रेन सेटचे उत्पादन टप्प्याटप्प्याने केले जाणार असून, येत्या ३० महिन्यांच्या कालावधीत ते पुणे मेट्रोकडे प्रत्यक्ष उपलब्ध होतील. सध्या मेट्रोकडे ३४ ट्रेन सेट आहेत. नव्या १२ ट्रेन आल्यावर पुणे मेट्रोकडे एकूण ४६ ट्रेन सेट असतील.