कात्रज बायपास मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन पुणे – कात्रज बायपास मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रणसाठी नव्या आदेशाची अंमलबजावणी आज (मंगळवार) पासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी वेगमर्यादा ओलांडणाऱ्या ११० वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. दरम्यान, महामार्गावर स्वामी नारायण मंदिर ते वडगाव पुलापर्यंत वेगमर्यादेचे फलक लावले आहेत. भूमकर चौकाच्या पुढे पोलिसांनी गाडीमध्ये एक स्पीडगन बसवली आहे. त्याद्वारे ही कारवाई करण्यात आली. नवले पुलावर नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर सर्व यंत्रणांनी नियोजन करून तातडीच्या उपाययोजना केल्या. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस उपायुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांच्या आदेशानुसार कात्रज बायपासवरील भूमकर ब्रीज ते नवले ब्रीज शेवटपर्यंतच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किमी प्रतितास अशी निश्चित केली असून, अत्यावश्यक सेवांतील वाहने म्हणजेच अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदींना मात्र या आदेशातून सूट देण्यात आली आहे. नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. दरम्यान, अपघातानंतर वाहतूक पाेलिसांनी महामार्गावर विविध नियमांचे भंग करणाऱ्या ५,६२० वाहनांवर कारवाई करून ३३ लाख ५२०० रुपयांचा दंड वसूल केला. १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेत ८६३ वाहनांवर कारवाई करून १७ लाख ६३ हजार दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक (वाहतूक) सुनील गवळी यांनी दिली. दुभाजकांची दुरुस्ती महामार्गावर काही लॉजेस, तसेच अस्थापना आहेत. येथील रस्ता दुभाजक तुटलेले असल्याने त्यातून मार्ग काढून वाहने महामार्गावर जात होती. हे सर्व रस्ता दुभाजक आणि तुटलेले बॅरिकेडस महामार्ग प्रशासनाच्या वतीने दुरुस्त करून घेण्यात आले असल्याची माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.