Pune : दहावी-बारावीचे निकाल १५ मेपर्यंत

पुणे : यंदा दहावी व बारावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा दिवस अगोदर सुरू होत आहे. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षांचा निकालही १५ मेपर्यंत जाहीर होतील, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. त्याचप्रमाणे या वर्षीपासून पहिल्या टप्प्यात केवळ पहिलीच्या वर्गासाठी सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
शिक्षण विभागाच्या अखत्यारितील विषयांचा आढावा घेण्यासाठी भुसे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी राज्य मंडळाच्या कार्यालयात त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास ३० लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी केली आहे. यंदा परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात येत आहे. परिणामी त्यामुळे राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल यंदा १५ मेपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
यापूर्वी बारावीचा निकाल मेच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात जाहीर केली जात असे. परंतु, गेल्या काही वर्षांत बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात आहे. यावर्षी त्यापेक्षा लवकरच निकाल जाहीर होतील, असेही भुसे म्हणाले,
पहिलीच्या वर्गासाठी नवीन पुस्तके
राज्यातील शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शिक्षणाचा पॅटर्नची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ पहिलीच्या वर्गासाठी तर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात टप्पाटप्याने सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी केली जाणार आहे. बालभारतीमार्फत सीबीएसईची पाठ्यपुस्तके छापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, शाळांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याबाबतही चाचपणी करण्यात येत असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.





