तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मातोश्री तिलोत्तमा वसंतराव खांडगे उद्यानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित पर्यावरण पूरक प्रकल्पाच्या हस्त पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देवतारे, संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे, सोनबा गोपाळे, संदीप पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले. इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘जागतिक तापमान वाढ’ जागृती विषयक लघुनाटिका सादर केली. डॉ. विलास देवतारे यांनी इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करून शाळेने जपलेला पर्यावरणाचा वसा असाच वृद्धिंगत करावा, असे मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळे गुरुजी यांनी केले. सूत्रसंचालन चैताली ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन आणि शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले.